बुधवार, २७ डिसेंबर, २०१७

सिक्किमनेे देशातले पहिले सेंद्रिय राज्य होण्याचा मिळवला आहे. सिक्किमच्या खालोखाल केरळनेसुध्दा सेंद्रिय शेतीला आपल्या राज्यामध्ये मोठा बढावा दिलेला आहे. कारण या दोन राज्यातल्या कृषीतज्ञांना आणि विशेषतः शेतकर्‍यांना सेंद्रिय शेतीचे महत्त्व लक्षात आले आहे. आज देशातले पहिले सेंद्रिय राज्य म्हणून सिक्किमला मान दिला जात आहे आणि त्यानिमित्ताने तिथे सेंद्रिय शेती परिषद होत आहे. तिला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित आहेत. सिक्किममधील ७५ हजार हेक्टर क्षेत्रावर सेंद्रिय शेती सुरू करण्यात आली आहे. शेती या विषयाची माहिती असणार्‍या आणि नसणार्‍या त्याचबरोबर शेतीशी काही संबंध नसणार्‍या अशा अनेक लोकांना सेंद्रिय शेती करणारे राज्य म्हणजे नेमके काय याचा बोध होण्याची शक्यता कमी आहे. कारण मुळात सेंद्रिय शेती म्हणजे काय याची जाणीव सामान्य लोकांत तर सोडाच पण शेतकर्‍यांमध्येसुध्दा राहिलेली नाही. त्यामुळे आधी सेंद्रिय शेती हा काय प्रकार आहे हे समजून घ्यावे लागेल. थोड्या ढोबळमानाने सांगायचे झाल्यास असं सांगता येईल की, सध्या शेतीमध्ये ताबडतोब होणारी उत्पादनवाढ पदरात पाडून घेण्यासाठी रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे.
पिकांवर पडलेल्या रोगांचा, किडींचा आणि बुरशींचा बंदोबस्त करण्यासाठी रासायनिक खते आणि विषारी औषधे मोठ्या प्रमाणावर वापरली जात आहेत. यांच्या वापरामुळे शेतीचे तंत्र फार बदलून गेले आहे आणि आपली शेती ही रासायनिक झाली आहे. या रासायनिक खतांचा आणि औषधांचा वापर एवढा सर्वंकष झाला आहे की शेती म्हटली म्हणजे त्यांचा वापर होणे अटळ आहे असाच लोकांचा समज झाला आहे. खरे म्हणजे रासायनिक खतांचा शोध अलीकडच्या ७०-८० वर्षातला आहे. भारतात तर त्यांचा वापर गेल्या ४० वर्षांत वाढला आहे. मग त्याच्या पूर्वी भारतात शेती नव्हतीच का? शेतीची परंपरा १० हजार वर्षांची आहे. म्हणजे रासायनिक खतांचा वापर न करताही शेती होऊ शकते. किंबहुना ती तशी १० हजार वर्षांपासून होत आलेली आहे आणि ती शेती रसायनांचा वापर न करता केली जात होती. ती जी बिगर रासायनिक शेती आहे तिलाच सेंद्रिय शेती असे म्हटले जाते. सेंद्रिय शेतीमध्ये शेती उत्पादन काढण्याकरिता रसायनांचा वापर न करता निसर्गातून उपलब्ध झालेल्या सेंद्रिय पदार्थांचा वापर केला जातो. आपण परंपरेने तसा तो करत आलेलो आहोत आणि खत म्हणून शेणाचा, मलमूत्राचा वापर मोठ्या प्रमाणावर करत आलेलो आहोत. पुन्हा एकदा त्याच जैविक साधनांचा वापर करून शेती करणे म्हणजे सेंद्रिय शेती होय.
सिक्किममध्ये राज्य सरकारने रासायनिक खताला बंदी घालून आणि सेंद्रिय पदार्थाच्या वापराला प्रोत्साहन देऊन आपली परंपरागत सेंद्रिय शेती वाढवली आहे आणि पूर्ण सेंद्रिय शेती करणारे राज्य असा लौकिक मिळवला आहे. सेंद्रिय शेतीची गरज का आहे हे आधी पाहिले पाहिजे. या गरजेचे पहिले कारण आहे आर्थिक आणि दुसरे आहे ते आरोग्याचे. रासायनिक खतांच्या वापराने शेतातल्या गांडुळांची संख्या कमी होते. गांडूळ हा शेतकर्‍यांचा मित्र असतो असे परंपरेने सांगितले जाते मात्र त्याकडे मधल्या काळात दुर्लक्ष झाले. परंतु गांडूळ शेतकर्‍यांचा मित्र असतो. या म्हणण्यात फार मोठा आशय सामावलेला आहे. गांडूळ शेतातली माती भुसभुशीत करतो आणि शेत नांगरण्याचे खर्च वाचवतो. दुसरी गोष्ट म्हणजे त्याने जमीन भुसभुशीत केली की पिकांच्या मुळांची मातीत होणारी हालचाल सोपी जाते आणि मुळे सहजतेने जमिनीत खोलवर जाऊन अन्न आणि पाणी शोषून घेतात. मुळे जेव्हा असे अन्नपाण्याचे शोषण करतात तेव्हा पिकांची वाढ चांगली होते. म्हणजे गांडूळामुळे पिक चांगले येते.
गांडूळांना डोळे नसल्यामुळे ते स्पर्श होईल ते खात राहतात आणि खातात खाता मातीच्या आतील रोगजंतूंचाही फडशा पाडतात. त्यामुळे पिकांवर रोग कमी पडतात आणि महागडी औषधे आणून फवारण्याची गरज लागत नाही. म्हणजे गांडूळामुळे शेतकर्‍यांचा उत्पादन खर्च वाचतो. सेंद्रिय शेतीतला गांडूळ हा महत्त्वाचा घटक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे संेंद्रिय खते तयार करताना शेतातल्या काडीकचर्‍याचा वापर केला जातो. तो काडीकचरा एरवी वाया जात असतो. परंतु त्यांचाच खत म्हणून वापर केल्यास रासायनिक खते विकत आणण्याची गरज भासत नाही आणि शेतकर्‍यांचे पैसे वाचतात. गांडूळाच्या पोटात एक विशिष्ट प्रकारची भट्टी आहे. त्या भट्टीतून त्याने खाल्लेल्या मातीत नत्र मिसळले जाते. म्हणजे गांडूळ हा युरियाचा पुरवठा करणारा फुकटचा कारखानदारसुध्दा असतो. त्यातूनही शेतकर्‍यांचे पैसे वाचतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रासायनिक शेतीमध्ये वापरली जाणारी रसायने पिकांच्या शरीरात आणि धान्यामध्ये मिसळली जातात आणि आपण ते धान्य खातो तेव्हा ती शोषली गेलेली विषारी द्रव्ये धान्यांच्या माध्यमातून आपल्या पोटात जातात आणि त्यांचे आपल्या शरीरावर मोठे विपरित परिणाम होतात. त्यातून अनेक प्रकारची रोगराई पसरते. अलीकडच्या काळात ते परिणाम लक्षात यायला लागले आहेत आणि म्हणूनच रासायनिक शेतीपेक्षा सेंद्रिय शेतीतल्या मालाला लोकांची मागणी यायला लागली आहे. कारण सेंद्रिय शेतीतली उत्पादने विषमुक्त असतात. हे लोकांच्या लक्षात आले आहे. याही दृष्टीने सेंद्रिय शेती आपल्या हिताची ठरणार आहे. आज सिक्किम हे राज्य सेंद्रिय शेती करणारे राज्य ठरले आहे. हळूहळू देशाच्या अन्य राज्यांमध्ये सेंद्रिय शेतीचा प्रचार झाला पाहिजे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thank You
save the mother earth mission
support
www.agrohealthorganic.com

 अरहर (तुवर) खेती।   मल्टीप्लायर तकनीक के साथ।           १) किसान भाई का नाम श्री रविंद्र दरसिम्बे धारणी जिला अमरावती महाराष्ट्र।   २) मार्ग...